पोलीस यंत्रणा विश्वास निर्माण करेल का?
पोलीस यंत्रणा विश्वास निर्माण करेल का?
भादली हत्याकांड घडून नऊ दिवस उलटले आहे. प्रदीप भोळे यांच्या कुटूंबियांची अमानुषपने हत्या करण्यात आली. त्यामूळे जिल्ह्यात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्याकांडातील मारेकरी कोण? त्यांनी का हत्या केली असावी? याचा उलगडा अद्यापही होतांना दिसत नाही. पोलीस यंत्रणा गेल्या नऊ दिवसांपासून दिवसरात्र गुन्हेगार शोधण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन तपास करीत आहेत. मात्र अद्यापही पोलीसांच्या हातात काहीही पुरावे आले नाही. त्यामूळे पोलीसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. पोलीस यंत्रणा त्या मारेकरांपर्यंत पोहचेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. मारेकर्यांचा शोध घेवुन तात्काळ शासन करावे आणि जनमाणसांमध्ये पोलीस यंत्रणेनेवरील विश्वास अबाधित ठेवावा, अशी अपेक्षा आहे.
मारेकर्यांकडून क्रुर विकृतीचे दर्शन घडलेल्या भादली हत्याकांडाच्या घटनेने जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले. घटनेच्या दिवशी जिल्हाचे पालक‘मंत्री’ सोडून जिल्ह्यातील आजी-माजी मंत्र्यांनी घटनास्थळी भेटी दिल्यात. तपासाला वेग देण्यासाठी पोलीस यंत्रणांना सुचनाही दिल्या. पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, आयपीएस अधिकारी श्री. निलोत्पल, कलवाणिया या चार आयपीएस अधिकार्यांसह एलसीबीसह पाच स्वतंत्र पथकेही तपासासाठी तयार करण्यात आलेत. मारेकर्यांच्या सुगाव्यासाठी रात्रंदिवस यंत्रणा कामाला लागली आहे. या यंत्रणेला गावकर्यांनी सहकार्य करणे अपेक्षीत आहे. परंतु सहकार्य मिळत नसल्याने पोलीस यंत्रणा त्या मारेकर्यांपर्यत पोहचण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसु लागले आहे. किंबहुना या ना त्या माध्यमातुन सहकार्य मिळेल आणि मारेकर्यांपर्यंत थेट पोहचता येईल, या उद्देशाने पोलीस यंत्रणेने ५० हजाराचे बक्षिस जाहीर केले. तरीही देखील कुणीही पुढे का येत नाही? ही बाब अतिशय चिंताजनक आहे. याचे कारण पोलीसांबद्दलची आपुलकी आणि विश्वास संपुष्ठात आलेला आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामूळे आता जनमाणसातील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी पोलीसांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अमळनेर येथील वाळूमाफियाला एमपीडीएची नोटीस बजविणीबाबत चुकीची माहिती देणार्या प्रभारी अधिकार्याला तात्काळ नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते. मात्र आठ दिवस होत नाही तोच त्याच अधिकार्याची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. असो, मात्र अश्या अनेक घटनांमूळे हळुहळू पोलीसांची प्रतिमा जनमाणसात मलिन होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र अश्या घटनांमूळे यंत्रणा आरोपींना सहकार्य करीत आहेत की, त्यांना शासन करीत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाविषयी साशंकता निर्माण होवु लागली आहे. खरं तर पोलीसांनी याचा सर्वस्वी विचार करुन जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत कशी राहिल? गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळविता येईल? तपास यंत्रणा अधिक सक्षम कशी करता येईल? याबाबत पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हाचे पालकमंत्री असलेले ना. चंद्रकांत पाटील यांनी विचार करणे अपेक्षीत आहे.
देवेंद्र पाटील ९६७३९३४६१८
Comments
Post a Comment